।।श्री स्वामी समर्थ ।।
दास परिवार
श्री महालक्ष्मी, श्री स्वामी समर्थ स्व-साधनालय गुरुमाऊली यांनी स्वआश्रयाकरिता एक अत्यंत लहान वास्तू घेतली होती. श्री गुरुमाऊली म्हणजेच वेदशास्त्रसंपन्न, वेदमूर्ती, मठाधिपती. त्यांच्या विद्वत्तेला शोभेल असे ‘गुरुमाऊली’ हे नाव आम्ही भक्तमंडळींनी त्यांना दिलेले आहे.
लहानपणापासून श्री. गुरुमाऊलींचा परमेश्वरशक्तीवर प्रचंड विश्वास होता. भक्तिमार्गाच्या ध्यासामुळे ते सतत परमेश्वराशी भक्तीरूपाने जोडले गेलेले असत. असे असता काहीही ध्यानीमनी नसताना सन १९८९ साली पवित्र महिना मार्गशीर्ष, शेवटचा गुरुवार रात्री ३.३० मिनीटांनी श्री स्वामी समर्थांनी श्री गुरुमाऊलीना श्रीलक्ष्मीच्या रूपात येऊन दृष्टांत दिला व आज ही तिथे शक्तीरूपाने त्यांचे वास्तव्य आहे. त्यावेळी परमेश्वराला फक्त त्यांच्यापाशी असलेल्या कठोर भक्तीचीच ओढ होती. श्री गुरुमाऊलींचे सुमधुर वेदपठण जणूकाही सतत ऐकण्यासाठीच श्री स्वामी समर्थ महाराज तेथे शक्तीरूपाने येऊन वीराजमान झाले. त्यांना त्यांच्या या बालकाकडून भविष्यात अनेक लोकोपयोगी, जनहीतार्थ सत्कार्ये करून घ्यायची होती.
पुढील प्रवास कडक साधना, ध्यानधारणा, दैवीशक्तीने घालून दिलेले सर्व नियम, पुढील कार्याची सुरुवात कशी करायची याचे मार्गदर्शन यामध्ये मधल्या दोन वर्षांचा काळ परमेश्वरी संकेतानुसार गेला. हा काळ अत्यंत कठोर शिस्तीचा व कठोर नियम पालनाचा होता. या कालावधीत श्री. गुरुमाऊलींनी ‘श्री गुरुचरित्र’ या ग्रंथाचे अनुष्ठान केले, तेही साडेतीन महिने दररोज, त्याचानियम असा होता की, एक मांडी व एक आसन, सकाळी ६ ते संध्याकाळी ६ अशा १२ तासांचे, काहीही न खातापिता, पाणीही ग्रहण न करता हे अनुष्ठान केले. व अनेक वेगवेगळ्या स्थानामध्ये तसेच जंगल, अरण्या मध्ये जाऊन अश्या पद्धतीने वेगवेगळी अनुष्ठाने केली आहेत. त्यानंतर दैवीशक्तीकडून श्री. गुरूमाऊली यांना १२ महिने जंगल साधना करण्याचा आदेश झाला. या सर्व दिव्यातून बाहेर पडल्यानंतर सन १९९१ साली श्री. गुरुमाऊली यांचे पवई येथील घरामध्ये श्री स्वामी समर्थांच्या, श्री महागुरूंच्या आज्ञेनुसार स्थानाची स्थापना करण्यात आली. तो सोनेरी दिवस होता दि. २५ जुलै, १९९१.
स्थानात सध्या असलेली श्री महालक्ष्मीची मूर्ती ही प्राचीन काळापासून श्री. गुरुमाऊलींच्या श्री. महागुरूंकडे होती. महागुरूंकडे त्यावेळी तपश्चर्येला गेलेल्या श्री. गुरुमाऊलींबरोबर अजून दोन म्हणजेच एकूण तीन शिष्य होते. परंतु त्यावेळी श्री. महागुरूंकडून श्री. गुरुमाऊलींना पालन व घोर तपश्चर्या या सर्वात सर्वश्रेष्ठ म्हणून निवडले गेले. ही गोष्ट पण सामान्य नव्हती व त्यांना ही मूर्ती त्यांचे श्री महागुरूंकडून त्यांचे वेदशास्त्र संपन्नता, वेदमूर्ती, तसेच सर्व साधना नियमांचे कठोर पालन करून कठोर तपश्चर्या केली म्हणून प्रसंन्न होऊन श्री. महागुरूंकडून महालक्ष्मीची मूर्ती प्राप्त झाली. सदर मूर्ती श्री. गुरुमाऊलींना देऊन मंत्रशक्तीची दीक्षा देऊन श्रीक्षेत्र पवई येथे ही मूर्ती स्थापना करण्यास सांगण्यात आली व त्यानंतर श्री स्वामी पादुकांची स्थापना करण्यात आली. यानंतर श्री. गुरुमाऊलींचा पुढील प्रवास व स्थानाचे दिवसेंदिवस वाढत गेलेले महात्म्य म्हणजे पुढे लगेच श्री सिद्धराज माणिक प्रभू महाराज यांची गुरुदीक्षा प्राप्त झाली. व लगेच दोन महिने पूर्ण होतात न होतात तोपर्यंत श्री महायोगी श्री नारायणकाका ढेकणे यांजकडून या पवित्र स्थानात बसून श्री. गुरुमाऊली यांना महासिद्धयोगाची महादीक्षा प्राप्त झाली. या दीक्षाप्राप्तीनंतर श्री. गुरुमाऊलीची हिमालयात साधनेला सुरुवात झाली. तसेच भारतभ्रमण व वेगवेगळी जंगल साधना, तपश्चर्या सुरू झाली. आजपर्यंत अनेक महायोगी, महाज्ञानी महासंत या स्थानात येऊन गेले आहेत व अनेक सिद्धयोगींचे आशीर्वादही या स्थानाला प्राप्त झालेले आहेत. आजही या स्थानामध्ये अनेक अद्भुत अनुभूती येत आहेत.
या स्थानामध्ये श्री गुरुमाऊलींच्या तपश्चर्या व साधनेने काही मंत्र समोर आले आहेत व या मंत्रांचा कुठल्याही ग्रंथ, वेद पुराण मध्ये उल्लेखही नाही व कोणालाही माहिती नाही. असे हे सिद्ध मंत्र स्थानात प्रगट झाले आहे व याचा लाभ स्थानात येणाऱ्या हजारो लाखो भाविकांना गेली ३०-३५ वर्ष होत आहे. हिच आमच्या स्थानाची शक्ती आहे.
म्हणूनच येथे अनेक भक्त प्रथम संपर्क साधून प्रत्यक्ष दर्शनाला येतात. असेच या स्थानाचे महात्म्य आहे.
श्री स्वामी समर्थ दास परिवार

